भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशविरोधी गोष्टी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राजधानी लखनऊमधील एका शाळेत मुख्यमंत्र्यांनी अशी परिस्थिती का उद्भवली? असा सवाल उपस्थित केला आहे.
लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूल मध्ये आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपले सर्वांचे लक्ष्य ‘नेशन फर्स्ट’ म्हणजेच ‘राष्ट्र प्रथम’ असले पाहिजे. हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय असले पाहिजे. सध्या देशात जे घडत आहे ते पाहताना मी कधी कधी सोशल मीडियावर नजर टाकतो आणि मला काही ट्विट्स दिसतात, जे देशविरोधी आहेत आणि आपल्या सैन्याच्या इच्छाशक्तीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. ही अशी परिस्थिती का निर्माण झाली? ही भूमी आपल्या सगळ्यांची आई आहे आणि पंतप्रधानांनीही ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, जीवन एकपक्षीय असू शकत नाही. विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील आपलं स्थान निर्माण करू शकतात. कार्यक्रमाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक पोस्ट देखील केली. त्यांनी लिहिलं की, “लखनऊ येथे आयोजित ‘शिक्षक आभार समारंभा’त सहभागी झालो. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांचं उत्साहवर्धन केलं. मला पूर्ण विश्वास आहे की शिक्षणाला संस्कार, राष्ट्रभक्ती आणि भारताच्या परंपरांशी जोडत भारतीय संस्कृतीला बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन पुढे जाऊ,” असे त्यांनी म्हटले. विकसित भारत तोच असेल, जिथे प्रत्येक नागरिक सुरक्षित, समृद्ध आणि आत्मनिर्भर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेला ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करण्यामध्ये शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. शिक्षक अशी पिढी घडवण्याचं कार्य करत आहेत, जी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर नैतिकदृष्ट्याही बळकट असेल.
मुख्यमंत्री योगी आदि त्यनाथ यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत सांगितले की, आपल्यासाठी “नेशन फर्स्ट” म्हणजेच राष्ट्र प्रथम हेच पहिले मंत्र असले पाहिजे. हे कार्य केवळ देशाचे नेतृत्व, सैन्याचे जवान किंवा प्रशासनिक अधिकारी यांचेच नाही, तर शिक्षकांचेही आहे. त्यांनी सोशल मिडियाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत असेही सांगितले की, जेव्हा युवकांमध्ये राष्ट्राबद्दल श्रद्धेचा अभाव असतो, तेव्हाच देशविरोधी विचारांची पेरणी होते. त्यामुळे शिक्षकांचे हे कर्तव्य आहे की ते विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच देऊ नयेत, तर त्यांच्यात देशभक्ती आणि नैतिकतेची जाणीवही निर्माण करावी, असे त्यांनी म्हटले.


