Wednesday, February 25, 2026

नालेगाव गाडगीळ पटांगण परिसरात वाहतूक कोंडी ; भाजी बाजारामुळे नागरिक त्रस्त

नालेगाव गाडगीळ पटांगण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र – भाजी बाजारामुळे नागरिक त्रस्त, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी): शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण परिसरातील रस्त्यावर दररोज बसणारा भाजी बाजार हा आता नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरला आहे. या ठिकाणी सकाळपासूनच विक्रेत्यांची गर्दी होत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशी, विद्यार्थी, तसेच नालेगाव अमरधामकडे जाणारे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. गाडगीळ पटांगण हे शहरातील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असून, येथे अनेक नागरिक सकाळी-सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी येतात. मात्र, नियोजनाअभावी भाजीविक्रेते पटांगणाच्या आत न बसता थेट मुख्य रस्त्यावरच आपली गाडी किंवा टोपली घेऊन बसतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते आणि काही वेळातच वाहतूक कोंडी निर्माण होते. दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांच्या रांगा लागत असल्याने नागरिकांना त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. स्थानिक नागरिकांच्या मते, या भागात वाहतूक नियंत्रणासाठी ना पोलिसांची उपस्थिती असते, ना महापालिकेचे कुठलेही नियोजन दिसते. “दररोज सकाळ-संध्याकाळ आम्हाला वाहतूक कोंडीत अडकावे लागते. विशेषतः नालेगाव अमरधाम येथे अंत्यविधी किंवा दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या लोकांनाही या गोंधळाचा सामना करावा लागतो. अशा वेळी गाड्या पुढे सरकणेही अवघड होते,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली. नालेगाव ग्रामस्थांनी महापालिकेकडे ठोस मागणी केली आहे की, गाडगीळ पटांगणाच्या रस्त्यावर बसणारा भाजी बाजार तातडीने आतमध्ये हलवावा. पटांगणात पुरेशी जागा असूनही विक्रेते रस्त्यावर बसतात, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. महापालिकेने कडक कारवाई करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. वाहतूक कोंडीमुळे फक्त त्रासच नव्हे, तर अपघातांची शक्यता देखील वाढली आहे. अनेक वेळा लहान मुले आणि वृद्ध नागरिक वाहनांच्या गर्दीतून जाताना धोक्यात येतात. त्यामुळे ही समस्या केवळ सोयीची नव्हे तर सुरक्षेची देखील बनली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles