Friday, October 31, 2025

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी ;या नेत्याचा पुढाकार

अहिल्यानगर : नगर शहरात महायुतीमध्ये अनेकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवार गट व ठाकरे गट या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांशी यासंदर्भात चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडीऐवजी समविचारींना बरोबर घेऊन शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार लंके यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप येत्या ३ सप्टेंबरला जाहीर होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सूतोवाच केलेले आहे. त्यामुळे शहरात प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका, उमेदवारीची चाचपणी, संघटनात्मक बाबींकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. नेत्यांचे दौरेही वाढले आहेत.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गट, ठाकरे गट व काँग्रेस यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीऐवजी शहर विकास आघाडी स्थापन करून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी खासदार लंके यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने, महायुतीत असले तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार असल्याचा दावा केला आहे. मात्र याच पक्षाचे शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीमधीलच काहींना ही भूमिका पसंत पडलेली नाही. तसेच भाजपमध्येही पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे वर्चस्व वाढल्याने काही निष्ठावंत पदाधिकारी अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी महायुतीमधील मुस्कटदाबी होत असल्याची भावना असणारे नेते संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

नगर शहर विकासात अनेक वर्षांचा मोठा अनुशेष राहिला आहे, तो भरून काढायचा आहे. त्यामुळे अनेकांना महापालिकेत आमचा सहभाग आवश्यक वाटतो. महायुतीमध्येही मुस्कटदाबी होत असल्याची भावना असणारी नेतेमंडळी संपर्कात आहेत, त्यांनाही बदल घडवायचा आहे. त्यामुळे समविचारींना एकत्र करून शहर विकास आघाडीमार्फत महापालिका निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीसाठी समविचारींना बरोबर घेऊन शहर विकास आघाडी स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू आहे. शहरात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. तो भरून काढायचा आहे. महायुतीमधील अनेकांना त्यांची मुस्कटदाबी होत असल्याची भावना आहे. त्यांनाही महापालिकेत बदल घडवायचा आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीसाठी आम्ही पक्षाचे नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. – खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles