अहिल्यानगर -गुणवडी (ता. अहिल्यानगर) गावात एका बाजूला 70 वर्षीय वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, दुसर्या दिवशी त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मजुरावर झालेल्या मारहाणी व जातीवाचक शिवीगाळीच्या प्रकरणी सात जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.मालन प्रकाश परभणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या शुक्रवारी (10 ऑक्टोबर) रात्री 11:30 वाजता घराच्या पडवीत झोपलेल्या असताना, एका व्यक्तीने लाकडी दांडक्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील काळ्या-पिवळ्या मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. संशयावरून दुसर्या दिवशी शनिवारी (11 ऑक्टोबर) सकाळी संशयित आरोपींच्या घरी चौकशी करण्यासाठी गेल्यावर, रवींद्र युनुस काळे, अर्चना रवींद्र काळे आणि ऋतुजा रवींद्र काळे (सर्व रा. गुणवडी) यांनी मालन व इतरांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तुमच्याविरूध्द खोटी फिर्याद देऊ अशी धमकी दिली. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर शनिवारी सकाळी 8 वाजता, याच गावात रवींद्र युनुस काळे (वय 45) यांच्यावर जातीय शिवीगाळ व मारहाणीची घटना घडली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, याआधी 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या गर्भवती शेळीला विषारी औषध फवारून ठार करण्यात आले, तसेच 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादाचा राग मनात धरून केशव बबन परभणे, अजिंक्य केशव परभणे, बबन रामजी परभणे, रावसाहेब रामजी परभणे, शारदा केशव परभणे, मालन बबन परभणे आणि कल्पना माधव परभणे (सर्व रा. गुणवडी) यांनी फिर्यादीस मारहाण करून उपरण्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी जातीवाचक शब्दांत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी संशयित सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.


