Tuesday, October 28, 2025

अजित पवार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रपदाची संधी कधी? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. यावेळी महाराष्ट्रातील युती सरकार व शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतचे संबंध याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेल्या भूमिकेची सध्या चर्चा सुरू झाली आहे. युतीमध्ये कुणाला काय आणि किती मिळू शकतं? यासंदर्भात आम्हाला तिघांनाही पुरेशी कल्पना आहे, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

“आम्ही तिघं अनुभवी नेते आहोत. राजकारणात सीमा काय आहेत हेही आम्हाला कळतं. कुठपर्यंत आपल्याला गोष्टी मिळू शकतील, आघाडीत काय मिळू शकतं, काय मिळू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. महत्त्वाकांक्षा असू शकतात, त्या असण्यात काही गैर नाही. पण मला असं वाटतं की आम्हाला त्या सीमा माहिती असल्यामुळे आमच्यात वाद होत नाहीत. काही मुद्द्यांवर वाद झाले तरी आम्ही एकत्र बसून ते सोडवतो”, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या पुढील निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. २०२९मध्येदेखील एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादीच भाजपासोबत असेल, असं ते म्हणाले. “आघाडी सरकारमध्ये त्या आघाडीला एकत्र ठेवणारा प्रमुख पक्ष मजबूत असेल, तर ती आघाडी टिकते. आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये बघितलं की तिघेही स्वत:ला प्रमुख मानत होते. त्यामुळे ते सरकार चालू शकलं नाही. आमच्या सरकारमध्ये भाजपा प्रमुख ताकद म्हणून काम करत आहे. आम्ही १३७ वर आहोत. अशा सरकारांमध्ये फार काही अडचणी येत नाहीत”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली.

“मला वाटतं की आमच्या दोन्ही सहकाऱ्यांना घेऊनच आम्ही २०२९ च्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आता सहकारी बदलण्याची शक्यता मला दिसत नाही. आता इथून पुढे अजित पवार व एकनाथ शिंदे यांना कायमच उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागणार का? असा प्रश्न यावेळी फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक विधान केलं.

“राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होत असतात. माझ्या पक्षात मी निर्णय घेत नाही. आमचं संसदीय मंडळ निर्णय घेतं. ते वेगळा निर्णयही घेऊ शकतात. त्यामुळे आज जो निर्णय झाला तोच कायम राहणार असं नाही. २०२९ मध्ये बदलही होऊ शकतो. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी नक्कीच अपेक्षा ठेवायला हव्यात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles