गेल्या दोन दिवसांपासून ठाण्याजवळील अंबरनाथ व अकोल्यातील अकोट या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून अनैसर्गित युती करण्यात आल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपानं अंबरनाथमध्ये चक्क काँग्रेसशी तर अकोटमध्ये थेट एमआयएमशी युती केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून परखड टीका होऊ लागली. विरोधकांकडूनदेखील या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य करण्यात आल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यासंदर्भात पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. यावेळी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेसोबतच मित्रपक्ष अजित पवार गट व एकनाथ शिंदे गटामध्ये चाललेल्या घडामोडींबाबतही त्यांनी भूमिका मांडली. तसेच, भारतीय जनता पक्षाकडून मुंबईत उत्तर भारतीय बड्या नेत्यांना बोलावून प्रचार कशासाठी केला जात आहे? या विरोधकांच्या प्रश्नालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.यावेळी अंबरनाथ व अकोट येथील अनैसर्गिक युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना कारवाईचा इशारादेखील दिला आहे. “मी स्पष्टपणे सांगतो की काँग्रेस आणि एमआयएमशी कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर कुणी हे केलं असेल, तर हे चुकीचं आहे. शिस्तभंग आहे. यावर कारवाई होईल. हे नाही चालणार. मी यासंदर्भात आदेश दिले आहेत. आम्ही यावर कारवाई करू”, असं देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत बोलताना स्पष्ट केलं आहे.


