Wednesday, October 29, 2025

आयुक्त यशवंत डांगे यांची अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह सर्व विभागात झाडाझडती

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची नगररचना विभागासह सर्व विभागात झाडाझडती

कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा घेतला आढावा; बदल्यांबाबत लवकरच निर्णय घेणार

नगररचनातील प्रलंबित फायली तत्काळ निकाली काढण्याचे आदेश

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह इतर विभागात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना आयुक्तांनी धारेवर धरत खडेबोल सुनावले. नगररचनासह इतर विभागात अनेक फायली, रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवडाभरात व्यवस्थित लावण्याच्या, तसेच अनावश्यक व कालबाह्य कागदपत्रे, अर्ज आदी आवश्यकता नसल्यास ते काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नगररचना विभागातील प्रलंबित फायली तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या.

नगररचना विभागाच्या कामकाजाबाबत व कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, फायली, रेकॉर्ड न सापडणे, फायली प्रलंबित असणे अशा तक्रारी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी अचानक विभागात जाऊन तपासणी केली. नगररचना विभागात स्वाती आहिरे यांच्याकडे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा आयडी तत्काळ तयार करावा व सहाय्यक संचालक स्नेहल यादव यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फायली त्यांच्या आयडीवर ट्रान्सफर कराव्यात. सर्व प्रलंबित फायली नियमानुसार मंजूरी देऊन मार्गी लावाव्यात. ज्यात त्रुटी असतील, त्या पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. येत्या दहा दिवसांत सर्व फायली निकाली निघतील, अशा प्रकारे नियोजन करावे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

तसेच, विभागात असलेल्या सर्व प्रकारच्या फायली, जून रेकॉर्ड व्यवस्थित लावावेत. फायली न सापडल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल. बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन पद्धतीने फायली घेऊन त्याला नियमानुसार मंजूरी द्यावी. बीपीएमएस प्रणालीत येणाऱ्या अडचणींबाबत शासनाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे माहिती देऊन त्या दूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नगररचना विभागासह इतर विभागातही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी अचानक भेट दिली. कार्यालयीन शिस्त पाळावी, कार्यालयीन वेळेत स्वतःच्या जागेवर थांबून वेळेत कामकाज करावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विभागातील स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. अस्वच्छता दिसल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या शनिवारी, रविवारी व सोमवारी महानगरपालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सुट्टी न घेता वेळेत कार्यालयात उपस्थित रहावे, अशा सूचनाही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles