अभूतपूर्व गर्दीने रमला जखणगाव मधील सामुदायिक जागरण गोंधळ.
मारुती महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट जखणगाव चा पुढाकार.
आरोग्यदायी गाव म्हणून राज्यातच नव्हे तर देशात सुप्रसिद्ध असणाऱ्या आरोग्य ग्राम जखणगाव मध्ये सामुदायिक जागरण गोंधळाचा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पार पडला.महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या कोमल ताई करण पाटोळे मेंढापूरकर जागरण गोंधळ पार्टीचा विशेष कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात गावातील एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 33 परिवारांनी या सामुदायिक जागरण गोंधळात सहभाग घेतला होता.
जखणगावच्या भूमीत खंडेश्वराचं पावन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की इथून मानाची काठी जेजुरीला पोहोचल्याशिवाय जेजुरीचे यात्रा सुरू होत नव्हती. गावातील गायकवाड परिवार, कर्डीले परिवार,मोरे परिवार व परिसरातील वाघमारे परिवार यांना या दैवताच्या पुजाऱ्याचा मान आहे. गावातील कर्डीले परिवाराला तर प्रत्येक घरी स्वतःचे देवघर नाही. या परिवारातील प्रत्येक कुटुंबाचे घट स्थापना ही सुद्धा खंडोबा मंदिरातच होते. एवढेच नव्हे तर कोणत्याही कुटुंबाने व्यक्तिगत जागरण गोंधळ घातल्यास त्यांनाही तो खंडोबा मंदिरासमोरच घालावा लागतो.याच पार्श्वभूमीवर गावातील लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनील गंधे यांच्या संकल्पनेतून, दक्षिणाभिमुखी हनुमान व हटकेश्वर महादेव यांच्या मंदिराच्या देखभालीसाठी मारुती महादेव मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून त्या मार्फत या आगळ्यावेगळ्या सामुदायिक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाची पूजन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दादासाहेब गुंजाळ साहेब यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. तर गोंधळाच्या कार्यक्रमाचा भंडारा खंडेश्वर देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या हस्ते उधळून कार्यक्रम सुरू करण्यात आला.सर्वप्रथम सहभागी झालेल्या सर्व जोडप्यांनाच नव्हे तर संपूर्ण परिवारालाच संयोजकाच्या वतीने पाची पोशाखाचा आहेर करण्यात आला. व हाच पोशाख घालूनच पूजेला सुरुवात झाली. वाघ्या व मुऱ्हळी यांनी पारंपारिक पद्धतीने देवांना आमंत्रण देऊन, घट उजळून,खंडोबा,अंबाबाई व सिद्धनाथ यांची घटस्थापना करून विधिवत सर्व देवांची पूजा केली. तद नंतर महाआरती करण्यात आली. उपस्थित सर्वांना मिस्टान्न भोजनाचा महाप्रसाद वाटण्यात आला. रात्री बरोबर नऊ वाजता जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.भव्य व्यासपीठ,पारंपारिक पिवळ्या रंगाची झालर, प्रदीर्घ मोठा सभामंडप, उत्तम बैठक व्यवस्था त्यामुळे जखनगावच नव्हे तर पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या हजारो भावीक भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कोमलताई च्या पहाडी आवाजाने व भक्तीगीताच्या संवाद्य मैफिलीने सर्व भक्त मंत्र मुक्त झाले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची अलोट गर्दी उसळली होती. नगर पारनेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून महिला खाजगी वाहन करून आल्या होत्या.थंडीची लाट असून सुद्धा व बिबट्याचे भीतीदायक वातावरण असतानाही लोकांनी या कार्यक्रमाला अलोट गर्दी केली होती. तसे 30 परिवारांनी जर आपले स्वतंत्र जागरण केले असते प्रत्येकी एक लाख प्रमाणे किमान 33 लाख रुपये खर्च आला असता. परंतु अत्यल्प खर्चात हे जागरण पार पाडले.या जागरणाच्या एकूण खर्चाचा भार प्रत्येक परिवाराने दहा हजार रुपयाची देणगी देऊन उचलला. तसेंच अन्नदानासाठी अनेक दानशूर लोकांनी मदत केली.सर्व जागरणाचा विधिवत उपक्रम पार पडला.
रात्री बारानंतर पुन्हा खंडोबा मंदिर समोर लंगर,देवाचं लग्न व कडी तोडण्याचा कार्यक्रम परंपरेप्रमाणे पहाटेपर्यंत चालला.
या पुण्यकर्मातून देव नक्कीच प्रसन्न होऊन हे जागरण पावन झाल्याची भावना सर्व सहभागी जोडप्यांनी व्यक्त केली.
एका परिवारातील सून बाळंतीण झाल्यामुळे त्या कारले परिवारातील तीन जागरण घालणारे कुटुंब विटाळ असल्यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत. खरे तर हे जागरण यापूर्वी नोव्हेंबर महिना अखेरीस धरले होते. परंतु गावातील मोठा असणाऱ्या कर्डिले परिवारातील एक ज्येष्ठ माता पारूबाई मोहनराव कर्डिले यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यामुळे कर्डीले परिवाराला दुखावटा असल्याने हे जागरण त्यांचा तेराव्याचा विधी झाल्यानंतर घालण्यात आले.
गाव एक संकल्पना नसून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, एकमेकाची सुखदुःख वाटून घेणारा एक परिवार आहे. त्यामुळे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेपेक्षाही गाव एक कुटुंब ही संकल्पना जखणगावकरांनी सिद्ध करून दाखवली.


