Sunday, November 2, 2025

महिला बचतगट व ग्रामसंघांना १ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप

मिरजगाव येथे ग्रामसंघांना १ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर दि. ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर रूजवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. अधिकाधिक महिलांना लखपती बनविण्यासाठी ‘लखपती दिदी’ ही योजना मिशन मोडवर राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे प्रभागसंघांतर्गत महिला बचतगट व ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधीचे प्रा. शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, तहसीलदार गुरू बिराजदार, गट विकास अधिकारी रूपचंद जगताप, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, नंदू नवले आदी उपस्थित होते.

प्रा.राम शिंदे म्हणाले, समुदाय गुंतवणूक निधीमुळे महिलांना आर्थिक बळकटी मिळत असून स्थानिक विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा उपक्रमांमुळे खऱ्या अर्थाने महिलांचा समावेशक विकास शक्य होत असल्याचेही ते म्हणाले.

कर्जत तालुक्यामध्ये १ हजार ७२५ बचतगट, ८१ ग्रामसंघ असून विविध बँकांमार्फत ४१ कोटी रुपयांचे बचगटांना कर्ज स्वरूपात वितरण केले असून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत सीड कॅपीटल म्हणून ९ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी ३६ उद्योगांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ३ कोटी पेक्षा अधिक फिरत्या निधीचे वाटप आज या निमित्ताने करण्यात येत असल्याचे सांगत सुमारे ५१ कोटी रुपयांचा निधी बचतगटातील महिलांना उद्योगासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बचगटांच्या माध्यमातून महिलांना संघटित करत त्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही प्रा. शिंदे म्हणाले.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दिदी’ योजनेतून महिलांना लखपती करण्याचा संदेश दिला आहे. कर्जत तालुक्यात आतापर्यंत ५ हजार २१० महिला लखपती दीदी झाल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता अधिकाधिक महिलांना योजनेतून लखपती बनविण्यासाठी ही योजना मिशन मोडवर राबविण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी क्षेत्रात सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘ड्रोन दीदी’ ही योजनाही प्रभावीपणे राबविण्यात यावी. ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी, पेरणी, जमिनीचे सर्वेक्षण आदी कामांचे महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक प्रकल्प संचालक राहुल शेळके यांनी केले. यावेळी ॲड. प्रतिभाताई रेणुकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात बचतगटातील महिलांनी आपल्या यशोगाथाही मांडल्या.

राशीन येथे ग्रामसंघांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप

कर्जत तालुक्यातील राशीन येथे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते ग्रामसंघांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप करण्यात आले.

बचतगट, लाडकी बहीण, लखपती दीदी, ड्रोन दिदी यासारख्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतूनच महिला समाजाच्या मुख प्रवाहात येऊन आपल्या व आपल्या कुटुंबांची आर्थिक उन्नती निश्चित साधू शकतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles