काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. याबाबत रविवारी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या विधानसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आकाश मोरे यांचं आव्हान असणार आहे.
या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी एक प्रमुख अट ठेवली आहे. त्यांनी म्हटले की, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दाही आहे, या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठीही आम्ही निवडणूक लढवत आहोत. जर राज्य सरकारने अजित पवारांच्या अपघातावर गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ, असे आकाश मोरे यांनी म्हटले. त्यामुळे आता महायुती सरकार काँग्रेसची ही अट मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. सध्याच्या घडीला बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, धनगर आणि ओबीसी मतांच्या बेरीज-वजाबाकीवर समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार हे बारामतीमध्ये कायम मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे. त्यामुळे बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार प्रयत्नशील आहेत.


