स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात काँग्रेसला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत आहेत. काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. आता कोकणात काँग्रेसमधून एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.रायगडमध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अलिबाग येथे प्रवीण ठाकूर यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते, महत्ताचे पदाधिकारी हजर होते.
प्रवीण ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीसपद होते. पक्षाच्या चिटणीसपदी असलेल्या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधी कैलास गोरंट्याल, आता प्रवीण ठाकूर असे नेते पक्षांतर करत असल्याने काँग्रेसला धक्यांवर धक्के बसले आहेत.
काँग्रेसमध्ये प्रवीण ठाकूर नाराज होते. माझ्या वडिलांवर, मधुकर ठाकूर यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेस पक्षाकडून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले आहे अशी माहिती प्रवीण ठाकूर यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.


