आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश
काँग्रेसचे गुंदेचा, चुडीवाला, भगत, लांडे, वंचित माजी जिल्हाध्यक्ष बारसेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश
मुंबई : आघाडी करून लढायचं की स्वबळावर त्याचा निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या. आघाडी करून लढणार असाल तर विधानसभे सारखा मनपा निवडणुकीत जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत विषय घोळत ठेऊ नका. ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत त्यावर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या. कोणत्याही परिस्थितीत अहिल्यानगर मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा, असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलाताई लांडे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील आप्पा लांडगे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, युवा नेते नीलेश लांडे आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधले. या प्रवेशा वेळी प्रवक्ते खा. संजय राऊत, सचिव खा. विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. प्रवेशां मुळे शहरात ठाकरे सेनेची ताकद वाढली आहे.
यावेळी कामगार सेनेचे विलास उबाळे, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपशहर प्रमुख सुनील भोसले, आकाश आल्हाट, शंकर आव्हाड, विकास भिंगारदिवे, महावीर मुथा, किशोर कोतकर, गणेश आपरे, विकेश गुंदेचा, मिलन सिंग आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून किरण काळे यांना सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात डांबलं. पण ते शरण गेले नाहीत. खा.संजय राऊत यांना देखील तुरुंगात टाकलं होतं. सातत्याने शिवसेनेवर हे हल्ले होत आहेत. शिवसैनिक याला कदापि डगमगत नाहीत. काळे हे उत्तम संघटन कौशल्य असणारे धाडसी, अभ्यासू नेते आहेत, असे म्हणत यावेळी ठाकरेंनी काळेंचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी ठाकरेंनी काळेंशी निवडणुकीच्या तयारी बाबत सविस्तर चर्चा करत रस्ते घोटाळ्या बाबत माहिती घेतली. खा. राऊत यावेळी उपस्थित होते. ठाकरेंनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी त्यांना केल्या. निवडणूक रणनीती बाबत चर्चा झाली. चर्चेचा सविस्तर तपशील मात्र समजू शकला नाही.
जामीना नंतर पहिल्यांदाच काळेंनी बलात्काराच्या कथित गुन्ह्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, अहिल्यानगर मनपाचा सुमारे ३५० ते ४०० कोटींचा घोटाळा पुराव्यांसह बाहेर काढल्या मुळेच माझ्यावर सत्ताधाऱ्यांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी बलात्कार केलेला नाही. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादी आणि माझ्यात कधीच संपर्क झाला नसल्याचा सीडीआर रिपोर्ट सादर केल्यानंतर मला जामीन दिला आहे. भ्रष्टाचार विरोधी आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून षड्यंत्र रचून मला राजकीय आयुष्यातून कायमच उध्वस्त करण्यासाठी डाव रचला गेल्याचा आरोप काळेंनी केला. मी मेहेरबान न्यायालयाचा आदर करतो. दूध का दूध, पानी का पानी होईल. सत्य समोर येईल. मी कोणतीही अग्निपरीक्षा देण्यासाठी तयार असल्याचे काळे म्हणाले.
पोलीस कोठडी, जेलमध्ये असताना पक्षप्रमुख ठाकरेंनी मला बांधलेले शिवबंधन पोलिसांनी तोडले. त्यावेळी माझ्या मनाला प्रचंड यातना झाल्या. आज पुन्हा एकदा ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधले आहे. सत्तेच्या दबावातून माझ्या मनातील शिवसेना कोणी काढू शकत नाही, असे काळे म्हणाले.
मुंबईतून बोलताना काळे यांनी दावा केला आहे की, शिंदे सेनेत गेलेले अनेक नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय केला जाईल, असे सूचक वक्तव्य काळेंनी केले.
अनेक चांगले उमेदवार ठाकरे सेनेकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक आहेत. आगामी काळात त्यांचे टप्प्याटप्प्याने प्रवेश पार पडतील, असे काळे म्हणाले.


