नांदेडच्या देगलूर येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार यांच्यासह 20 माजी नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष, 8 विद्यमान नगरसेवक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली रणनीती आखत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात जोरदार पक्षप्रवेश पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये अनेकजण जाताना दिसत असताना मात्र नांदेडमध्ये वारे फिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल 20 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला होता. दोन दिवसानंतर आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर,माजी उपनराध्यक्ष अविनाश नीलमवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते घेऊन आजी,माजी नगरसेवकांना सह आज प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात राजकीय गणित बिघडणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.


