शहरात संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा : किरण काळेंची मागणी
शहर ठाकरे शिवसेनेने तुंबलेल्या ओढ्या, नाल्यांचे फोटो व्हायरल करत
अहिल्यानगर : मनपा प्रशासनाने शहरात नालेसफाईचे काम जलद गतीने सुरू असल्याचे म्हटले होते. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शहर शिवसेनेने शहराच्या काही भागातील रस्ते, ओढे, नाल्यांची पाहणी केली. बहुतांशी सर्वच ठिकाणी मान्सून दाखल होण्याच्या उंबरठ्यावर असून देखील अद्यापही नाले सफाईची कामे सुरूच झालेली नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. याबाबतची पोलखोल करणारे फोटो, व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले आहेत. मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे ऐन पावसाळ्यात शहरात संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी काळे यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पावसाच्या पाण्याचा ओढा, नाल्यांमधून निचरा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. बहुतांशी ठिकाणी नाले सफाईच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. ज्या ठिकाणी नालेसफाई झाली आहे त्या ठिकाणी काढलेला गाळा हा नाल्याच्याच बांधावर टाकला जात आहे. वास्तविक पाहता तो वाहून नेणे आवश्यक होते. मात्र आता पावसामुळे तो पुन्हा त्याच नाल्यांमध्ये गेला आहे. त्यामुळे नालेसफाई करून देखील नाल्या तुंबलेल्याच आहेत. अशा निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
मुख्य मोठ्या ओढ्यांमध्ये झुडपं :
रासने नगर चौक, नगर मनमाड रोडवरील हॉटेल पंचशीलच्या बाजूला असणारा ओढा, पत्रकार चौकालगतचा ओढा, सर्जेपुरा स्मशानभूमी लगतचा ओढा या ठिकाणांची शहर शिवसेनेने पाहणी केली असता मुख्य मोठ्या ओढ्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपं, वाढलेली आढळून आली. तसेच यामध्ये प्लास्टिक, कचरा, राडा रोडा आढळून आला. यामुळे पावसाच्या पाण्याचा यातून निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पर्यायाने थोडा जरी पाऊस झाला तरी रस्ते जलमय होत आहेत. मान्सून काळात पाऊस जोराचा झाल्यास पाण्याचा निचरा न होण्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरणार आहे. ओढ्या, नाल्यांच्या आवश्यक प्रमाणात पाणी न वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे सीना नदीला जरी पूर आला नाही तरी देखील पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. अनेकांचे संसार मनपाच्या या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी पाण्यात वाहून जातात, बुडतात. नागरिकांचे यामुळे होणारे संभाव्य नुकसान आणि हाल टाळण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. मनपाने युद्ध पातळीवर नालेसफाईचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने किरण काळे यांनी केली आहे.
हा तर गिळंकृत ओढ्या, नाल्यांचा परिणाम :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडिया गेल्या अनेक वर्षांपासून गिळंकृत झालेल्या ओढ्या, नाल्यांबद्दल पोट तिडकीने मनपा प्रशासनाकडे कारवाई आणि ते खुले करण्याकरिता पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्याची कोणती ही दखल मनपा घेण्यास तयार नाही. काही बिल्डर लोकांनी शहराच्या टॉपोग्राफीवरील ओढे, नालेच गिळंकृत केल्यामुळे परिणामी शहरातील नैसर्गिक सांड पाण्याचे प्रवाह नष्ट झाले आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार देखील झाला आहे. नगररचना विभागाच्या तत्कालीन भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा यामध्ये सहभाग आहे. मनपाचा प्रभारी पदभार असणाऱ्या नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर विषयात लक्ष घालून गिळंकृत ओढ्या, नाल्यांचा तथा शहराचा श्वास मोकळा करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी किरण काळे यांनी निवेदनात केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरभर पाणीच पाणी साचले आहे. मनपाची, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने नालेसफाई कामांची पाहणी करण्याची गरज आहे. तहान लागल्यानंतर विहीर खांदण्याला काही अर्थ नाही. त्या आधीच केलेल्या उपाययोजना पुरेशा आहेत की नाही हे पाहणे आवश्यक आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे हेल्पलाइन क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करण्यात यावेत. नाले सफाई बाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समिती निहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. तेथे येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात यावी, अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.
शहराच्या ज्या भागांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्यात आले आहेत त्या ठिकाणी सांडपाणी, पावसाचे पाणी याचा निचरा होण्यासाठी नियोजनच करण्यात आलेले नाही. बंदिस्त गटारांत पाणी जाण्यासाठीची कोणतीही व्यवस्था, आउटलेट नसल्यामुळे काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवरतीच प्रचंड प्रमाणावर पाणी साचत आहे. मोठ्या काळासाठी पाणी यावर राहिल्यामुळे या रस्त्यांचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे रस्त्यांच आयुष्य देखील कमी होणार आ


