अहिल्यानगर -28 फ्लॅट व चार गाळ्यांच्या व्यवहारात अहिल्यानगर शहरातील एका बांधकाम व्यावसायिक महिलेची 34 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्पना चंद्रकांत गव्हाणे (वय 29 रा. गाडळकर मळा, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी रविवारी (19 ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवन प्रकाश मुळे (रा. सहकारनगर, सावेडी, हल्ली रा. पुणे), कल्पना सुरेश सोनसाळे (रा. गणेशवाडी, ठाणे), सुरेश सोनसाळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. ठाणे), प्रणिती वरकड (पूर्ण नाव माहिती नाही, रा. अहिल्यानगर), योगेश चुंभळकर (रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर), सोळंकी दिनेश सिध्दजी (पत्ता माहिती नाही) आणि पंकज भिमराज सिंग (पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2024 मध्ये जीवन मुळे याने बोल्हेगाव फाटा येथील ‘हरिशिला पार्क’ इमारतीमधील 28 फ्लॅट विकण्यासाठी फिर्यादी कल्पना गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला. मुळे याने इमारतीच्या मूळ मालक कल्पना सोनसाळे हिच्यासोबत व्यवहार झाल्याचा ‘एमओयू’ दाखवला.
या व्यवहाराची खात्री करण्यासाठी गव्हाणे यांच्या पतीने मूळ मालकाचे पती सुरेश सोनसाळे याला फोन केला असता, मुळे माझे नातेवाईक असून मी सरकारी नोकरदार आहे, तुमची फसवणूक होणार नाही, अशी हमी सोनसाळे यांनी दिली. या विश्वासावर गव्हाणे व त्यांच्या भागीदारांनी जीवन मुळे व त्याने सांगितलेल्या साथीदारांच्या खात्यावर वेळोवेळी रोख व ऑनलाईन पध्दतीने एकूण 25 लाख 25 हजार रूपये पाठवले. त्यानंतर मुळे आणि योगेश चुंभळकर यांनी गव्हाणे यांना त्याच इमारतीतील 4 गाळे विकत घेण्यास सांगून त्याचे बनावट मेमोरेन्डम ऑफ अन्डरस्टॅन्डींग (एमओयू) दाखवला. त्यापोटी 8 लाख 80 हजार रूपये रोख रक्कम स्वीकारली.
मात्र, नंतर मूळ मालक सुरेश सोनसाळे याने गाळ्यांचा कोणताही करार झाला नसल्याचे सांगितले व फ्लॅटचा व्यवहार करण्यासही टाळाटाळ केली. संशयित आरोपींनी संगनमत करून फ्लॅट व गाळ्यांपोटी एकूण 34 लाख पाच हजार रूपये घेऊन आणि मूळ फ्लॅट परस्पर विकून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


