ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या तलवाडा पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा समाजाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. मराठा मुलींबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडच्या शृंगारवाडीतील सभेमध्ये मराठा समाजाबद्दल आणि मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठा समाजातील मुलींचे लग्न आता आमच्या मुलांसोबत लावा या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक होत आज बीडच्या तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये मराठा समाज बांधवांकडून लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याविरोधात ओबीसी नेत्यांनी कोर्टात जाण्याची तयारी देखील सुरू केली आहे. याविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले असून ते ठिकठिकाणी सभा घेत सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. त्यांच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराईच्या बाग पिंपळगावमध्ये झालेल्या सभेत जमाव जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याआधी लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांविरोधात बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांनी मराठा समजाच्या आरक्षणाला विरोध करत मोर्चा काढला होता. या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे असताना देखील त्यांनी मोर्चा काढला होता. शारदा प्रांगणापासून ते प्रशासकीय भवनापर्यंत हा मोर्चा निघाला होता. यावेळी अंदाजे दीड ते दोन हजार जण जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


