धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
इंस्टाग्रामवर वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल केल्याने संताप
मंदिर दर्शनाच्या व्हिडिओवर अश्लील ऑडिओ जोडल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिशान बाबा शेख (रा. शहाली पिंपरी, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव असून, फिर्याद शिवनाथ नवनाथ घाटूळ (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांनी दिली आहे.
घटनेत, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज हे मौजे जवखेडे खालसा येथील कान्होबा देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी आले होते. ते चारचाकी वाहनातून फिर्यादीसह गावातील काही जणांसोबत मंदिराकडे जात असतानाचा व्हिडिओ काढण्यात आला होता. हा व्हिडिओ आरोपी जिशान बाबा शेख याने मिळवून त्यावर अश्लील व धार्मिक भावना दुखावणारा ऑडिओ जोडला. त्यानंतर हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल करण्यात आला.
या प्रकारामुळे गावातील नागरिक आणि भक्तांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या. याबाबत शिवनाथ घाटूळ यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी जिशान बाबा शेख याच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
इंस्टाग्रामवर वादग्रस्त व्हिडिओ,धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
- Advertisement -