Monday, November 3, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यात करोनाचे रुग्ण सापडले ,खासगी रुग्णालयात सुरू

अहिल्यानगर -महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नगर जिल्ह्यातही करोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून यातील एकावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसर्‍याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण अत्यावस्थेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात मे महिन्यात करोनाचे सर्वाधिक 405 रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत 467 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण 7 मृत्यू कोविडशी संबंधित असून हे रुग्ण आधीपासूनच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होते. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये काहींना मूत्रपिंड विकार, मेंदूविकार, मधुमेह, फुफ्फुसाचे विकार आणि इतर सहव्याधी होत्या. कोविडचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नगरमध्ये नव्याने करोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

तसेच मनपाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे अ‍ॅन्टीजेन चाचणीच्या 400 किटची मागणी केली असून ज्या ठिकाणी करोना रुग्ण सापडले आहेत, त्याठिकाणी त्यांच्या संपर्कात असणार्यांना शोधून गंभीर लक्षणे नसणार्यांना घरातच ठेवण्यात येणार आहे, तर गंभीर लक्षणे असणार्‍यांवर आरोग्य संस्थेत उपचार करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतिष राजूकर यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालय प्रशासन वाढत्या करोनावर लक्ष ठेवून असून जिल्हा रुग्णालयात करोनाची आरटीपीसी चाचणी सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेराव चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles