नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यात उघडकीस आला असून, बनावट नियुक्तीपत्रासोबतच नोटरीद्वारे करारनामा करून विश्वासार्हतेचे आवरण निर्माण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशाच प्रकारे इतर अनेकांचीही फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपेशकुमार राम बागडे (वय 39) व प्रियांका महादेव आदापुरे (वय 35, रा. शिक्षक कॉलनी, माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) या दांपत्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.तक्रारीनुसार, अर्जदार दांपत्य शिक्षक पदासाठी प्रयत्न करत असताना त्यांची ओळख सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) याच्याशी होती. खेडकर याने स्वतः छत्रपती संभाजीनगर येथील क्रीसेंट एज्युकेशन सोसायटी या अनुदानित संस्थेत नोकरी करत असल्याचे सांगत, डी.एड.च्या दोन जागा रिक्त असल्याचे आमिष दाखवले. यानंतर खेडकर याने संस्थाचालक लिंबराज रामचंद्र जाधव (रा. हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट घडवून आणली. जाधव यांनी प्रत्येकी 15 लाख रुपये, अशा एकूण 30 लाख रुपयांच्या बदल्यात दोघांनाही शिक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.नोकरीच्या आशेने दांपत्याने नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत आरटीजीएस, फोनपे व रोख स्वरूपात एकूण 30 लाख रुपये दिले. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या नावाने बनावट मान्यता आदेश व नियुक्तीपत्रही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. करारनाम्यात जवरे लक्ष्मण रघुनाथ, रुपेशकुमार राम बागडे, सुग्रीव तुकाराम खेडकर व प्रियांका महादेव आदापुरे यांची सहशिक्षक म्हणून नियुक्ती दाखवण्यात आली आहे. संबंधितांना त्यांच्या मूळ वर्गावर नियुक्त केल्याचे नमूद असून, कार्यकाळात बदल झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही प्रकारचा दगाफटका झाल्यास उमेदवारांकडून घेतलेली तब्बल 50 लाख रुपयांची रक्कम परत देण्याची जबाबदारी लिंबराज जाधव व सुभाष खेडकर यांच्यावर राहील, असा उल्लेख या करारनाम्यात आहे. हा करार साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वखुशीने करण्यात आल्याचेही नमूद आहे.
दरम्यान,प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दांपत्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.या प्रकरणात संबंधित आरोपींनी अशाच पद्धतीने इतर अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक गंडाघातल्याची शक्यता व्यक्त होत असून, या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करून इतर बळींचाही शोध घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित दांपत्याने केली असून, आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


