केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्षाला मूळ पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. तीन ते चार वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नुकतेच या प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. यावरून आता संजय राऊत यांनी थेट सरन्यायाधीश सूर्यकांत यांना टोला लगावला आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपाचे मंत्रीही स्वागतासाठी उपस्थित होते. एकनाथ शिंदेंच्या एक्स हँडलवर या भेटीचे फोटो पोस्ट करण्यात आलेले आहेत.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंची ही पोस्ट रिशेअर करत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर तिरकस भाष्य केले. “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!”, असे एका ओळीचे कॅप्शन संजय राऊत यांनी या फोटोला दिले आहे. या आठवड्यात होणारी अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचे हे विधान समोर आले आहे.


