अहिल्यानगर काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक दीप चव्हाण यांची नियुक्ती बद्दल सत्कार संपन्न
राहुल गांधी यांच्या संघर्षमय नेतृत्वाखाली देशातील सामान्य जनतेचा आवाज बुलंद होईल – दीप चव्हाण
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक दीप चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष ही केवळ एक राजकीय संस्था नसून, ती एक विचारसरणी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंत देशाच्या घडणीत काँग्रेसने मोलाची भूमिका बजावली आहे. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांनी देशाचे भविष्य घडवले आहे. राहुल गांधी यांच्या संघर्षमय नेतृत्वाखाली देशातील सामान्य जनतेचे आवाज बुलंद केला जात आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा देशाचे प्रभावी नेतृत्व करेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढा उभारेल, असेही चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. शहराच्या विकासासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असून, विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचारावर वाचा फोडण्यासाठी आणि पारदर्शक कारभार निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करेल. नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल.
या सत्कार समारंभ प्रसंगी माजी नगरसेवक फैयाज शेख, युथ आयकॉन शम्स हाजी समीर खान, तबरेज खान, फरहान शेख, नियाझ सय्यद, अजर खान, अल्फैज खान, आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शम्स हाजी समीर खान यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षच खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. 70 वर्षाच्या शासन काळात देशातील सर्व घटक समाजाला बळ देण्याचे काम काँग्रेसने केले. सध्या देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, युवकांची व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. तरुण वर्ग दिशाहीन होत असून त्यांना योग्य दिशा देणे ही आज काळाची गरज आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरमध्ये काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल आणि सर्व धर्म, जाती, वर्गांतील लोकांना न्याय देणारे संघटन म्हणून पुन्हा एकदा उभे राहील, असा विश्वासही शम्स खान यांनी व्यक्त केला.
शहरात राजकीय अपरिहार्यता निर्माण करून चालत नाही, तर वास्तववादी काम आणि लोकांचा विश्वास जिंकणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट असेल. काँग्रेस पक्ष हा संघर्षातून घडलेला आहे आणि यापुढेही तो सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करत राहील, असे शहर अध्यक्ष दीप चव्हाण यांनी सांगितले.


