घोडेपीर दर्गा प्रकरणात जेसीबी मालक अरुण खरात यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याची मागणी.
 समस्त आंबेडकरी बौद्ध समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन.
 अहिल्यानगर (प्रतिनिधी)– शहरातील पटवर्धन चौक येथे असलेला घोडेपीर दर्गा दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी पाडण्याची घटना घडली. या घटनेतील दोषींना पोलिसांनी पकडले असले तरी सदर प्रकरणात जेसीबी मालक आयु. अरुण खरात यांचे नाव अन्यायकारकपणे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. समस्त आंबेडकरी बौद्ध समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अरुण खरात यांचा या घटनेशी कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. त्यांची जेसीबी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या चालकांच्या ताब्यात असून, 24 ऑगस्ट रोजी घडलेला प्रकार हा केवळ चालकांच्या मार्फत घडून आलेला आहे. खरात यांना या संदर्भात काहीही माहिती नव्हती, मात्र ते जेसीबीचे मालक व बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांना अन्यायाने गुन्ह्यात ओढण्यात आले असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुष्यमान अरुण खरात यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. या वेळी निवेदन देताना सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड ,संजय जगताप, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, भीमराव पगारे, मयूर बांगरे, सुनील भिंगारदिवे , प्रशांत हातरूंकर, समीर भिंगारदिवे आदींसह समस्त आंबेडकरी बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नगर शहरातील घोडेपीर दर्गा प्रकरणात यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याची मागणी,पोलीस अधीक्षकांना निवेदन
- Advertisement -


