काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. भाजपा निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतचोरी करत असल्याचे कथित पुरावे देखील राहुल गांधी यांनी सादर केले आहेत. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी हे कपोकल्पित गोष्टी सांगत असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांवर घेतलेल्या संशयाच्या मुद्द्यावर बोलातना फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की अलिकडच्या काळात राहुल गांधी यांनी सलीम-जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून एक स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे, जी ते सगळीकडे मांडत आहेत. याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे तथ्यात्मक नाही, सगळ्या गोष्टी कपोकल्पित मांडल्या जात आहेत.
फडणवीस पुढे बोलताना म्हमाले की, एकीकडे ते म्हणतात की मतदार यादीमध्ये प्रॉब्लेम आहे, आम्हालाही मान्य आहे, आम्ही तर इतके वर्ष सांगतोत… आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिविजन करा. आता निवडणूक आयोग म्हणत आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिविजन करण्यासाठी आम्ही तयार आहोत, त्यांनी बिहारमध्ये सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात करू नका. मग त्यांना नेमकं हवं काय आहे? त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिविजनही माहिती नाहीये आणि मतदार याद्यांमधील अडचणीही माहिती नाहीत. त्यांना फक्त आपल्या हरण्याकरिता कारण शोधून काढायचं आहे, ते कारण त्यांनी शोधून काढलं आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


