ढाकणे शैक्षणिक संकुलाचे उच्च तंत्रशिक्षणातील भरीव कार्य — आमदार सत्यजित तांबे यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर :
 केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संगमनेर संचलित ढाकणे शैक्षणिक संकुल अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, राक्षी, शेवगाव येथे कै. सुनिताताई ढाकणे यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित्त “प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच औचित्याने मध्यवर्ती प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आमदार मा. सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी बोलताना आमदार तांबे म्हणाले, “संस्थापक अध्यक्ष डॉ. एकनाथराव ढाकणे व त्यांच्या कुटुंबियांनी या उजाड माळरानावर शैक्षणिक नंदनवन उभे केले आहे. ग्रामीण भागातील मुलामुलींना माफक दरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. उच्च तंत्रशिक्षणाबरोबरच परिसरातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे ही संस्थेची मोठी जमेची बाजू आहे. या संकुलाच्या भरभराटीसाठी आपण सर्वांनी मिळून भरघोस साथ द्यावी.”
यावेळी संस्थेने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आमदार तांबे यांनी २५ संगणकांची संगणक प्रयोगशाळा देण्याची घोषणा केली.
प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सकाळी ढाकणे परिवाराच्या उपस्थितीत कै. सुनिताताईंना अभिवादन करण्यात आले. गावातून ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत आमदार तांबे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला माननीय प्रसादजी मते (प्रांत अधिकारी, पाथर्डी), डॉ. एकनाथराव ढाकणे, ट्रस्टचे विश्वस्त, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एकनाथराव ढाकणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार तांबे यांच्या युवक, शेतकरी व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी असलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेखही सादर केला. मा. प्रसादजी मते यांनीही कॉलेजच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षा ऋषिकेश ढाकणे यांनी केले. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केदारेश्वर ट्रस्ट व शिक्षकवृंदाने एक लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांचे वाटप झाले.
यावेळी सुनील भीमाशंकर नागरे (चेअरमन, ग्रामसेवक पतसंस्था, अहिल्यानगर) यांचा नागरी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, कोषाध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, सचिव जया ढाकणे, प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्लेसमेंट ऑफिसर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा व्याख्याता निलेश पर्वत (संगमनेर) यांनी केले तर संयोजन प्रा महेश मरकड, प्रवीण नागरगोजे ,विश्वास घुटे , संपदा उरणकर , ज्ञानेश्वर गरपगारे , कृष्णा ढाकणे , पंचांरिया मॅडम , बतुळे सर, लहू गाढे, येवले मॅडम यांनी केले.आभार प्रदर्शन औताडे सुनील यांनी केले.


