धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला होता.
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीतील सध्याचा काळ हा अवघड आणि आव्हानात्मक मानला जात आहे. मस्साजोग गावच सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचा ‘राईट हँड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार जडला होता. त्यामुळे धनंजय मुंडे हे जवळपास अज्ञातवासात गेले होते. काही दिवसांपूर्वीच ते इगतपुरी येथे विपश्यनेसाठी गेले होते. याचदरम्यान त्यांच्या डोळ्यांचंही ऑपरेशन पार पडले होते. विपश्यना पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडे हे सोमवारी बीडमध्ये (Beed News) परतले. बीडमध्ये परतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम माजलगावचे दिवंगत माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी लातूर येथील अपघातात आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला होता.
धनंजय मुंडे यांनी आर.टी. देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला वंदन केले. यानंतर आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांची विचारपूस आणि सांत्वन केले. धनंजय मुंडे यांनी आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आलिंगन देऊन त्यांचे सांत्वन केले.


