बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि विविध ठिकाणी आंदोलने छेडली गेली. या घटनेनंतर बीडमधील वाढती गुन्हेगारी व दहशतीचं वातावरण चर्चेचा विषय ठरलं. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मारहाणीचे धक्कादायक फोटो समोर आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मुंडे यांनी राजीनामा देताना, आपण प्रकृती अस्वस्थ असल्याने मंत्रिपद सोडत असल्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. मात्र, आज (दि. 1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त परळी तहसील कार्यालयात झालेल्या ध्वजवंदन सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले धनंजय मुंडे आज या सोहळ्यास खास उपस्थित राहिले. सकाळी ठीक 8 वाजून 5 मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी परळी तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


