माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी कौटुंबीक प्रकरणात करुणा मुंडे यांना वांद्रे कुटुंब न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने करुणा यांची पोटगी कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आणखी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी करुणा मुंडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणाऱ्या धमक्याबाबतही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये, यासाठी याचिका दाखल केल्याचं करुणा मुंडे यांनी पुढे म्हटलं.
वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले, ‘मी करुणा मुंडे यांच्या वतीने वकील पत्र दाखल केलं आहे. दोन अर्ज दाखल केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे. त्यांनी ती कुठेही विक्री करू नये किंवा त्यात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप होऊ नये. अशा आशयाचा अर्ज दाखल केला. कोर्टाने या प्रकरणात धनंजय मुंडे यांना ६ जूनपर्यंत लेखी म्हणणं सादर करण्यास सांगितलं आहे’.
‘दुसरा अर्ज असा आहे की, कोर्टाची ऑर्डर असताना धमक्या देणे सुरु आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. धमक्या देऊ नये. हिंसेच्या गोष्टी करू नये. तिसरा अर्जात ६० लाख रुपये येणे बाकी आहे. ती रक्कम वसूल होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या सर्वाबाबत ६ जूनपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत कोर्टाने धनंजय मुंडे यांनी दिली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.


