बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आमदार धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. याप्रकरणी निकटवर्तीयांना खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्याने धनजंय मुंडेंनाही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, धनजंय मुंडेंना विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसले, ना कुठे सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळीही ते मुंबईतच होते. त्यावरुन, राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होतात. दरम्यान, आता राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेड दौऱ्यात धनंजय मुंडेंबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यांना नीट बोलता येत नाही, असे बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
नांदेडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगळं कायद्याने राज्य चालत नाही, माणसाची मानसिकता बदलली पाहिजे. माझा त्रास दुसऱ्याला होणार नाही, अशी खबरदारी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमाला माजी मंत्री धंनजय मुंडे गैरहजर राहिले, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्यासंदर्भाने राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारणा केली असता, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असून डोळे देखील वाकडे झाले आहेत. त्यांना बोलताही येत नसल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच, आमच्या मिटींगला ते मुंबईत येतात ना. काही कार्यक्रमांना ते हजेरी लावतात, जवळच्या व्यक्तींना आग्रह केल्यानंतर त्या कार्यक्रमांना ते जातात, असेही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धनंजय मुडेंनी प्रकृतीच्या कारणास्तव काही वेळ विश्रांती घेतल्याचं सांगितलं होतं. तर, मुंबईत त्यांच्यावर डोळ्याच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया देखील झाली होती. तेव्हापासून ते माध्यमांपासून व सार्वजनिक कार्यक्रमातून दूर आहेत.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील धनंजय मुंडेंची पाठराखण करताना मोठं वक्तव्य केलं होतं. धनंजय मुंडे भगवान गडाचेच आहेत, तुम्ही त्यांच टेन्शन घेऊ नका. मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांच्या गालावरून वारं गेलं आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाजकल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, असे शास्त्रींनी धनंजय मुडेंसंदर्भाने म्हटले होते.
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
 श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.
 मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.


