Tuesday, October 28, 2025

राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदील झालेल्या बाधितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रशासनाने कसलीही सबब न सांगता दिवाळीपूर्वी सबंधितांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान २६.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून बाधिताना मदतीसाठी २२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे ३३ जिल्हयातील सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि रत्नागिरी या आठ जिल्ह्यातील ५.९८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात एकूण ६८.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून उर्वरित जिल्हयातील पंचनामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच ऑगस्ट पर्यंत झालेल्या नुकसानीपोटी मंजूर करण्यता आलेल्या २२१५ कोटी रुपयांच्या निधीपैकी सुमारे १७०० कोटी रुपयांचे वाटप झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.आपत्तीग्रस्तांसाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची पुरेशी माहिती सरकारकडे उपलपब्ध आहे. त्यामुळे केवायसी व पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता आपत्तीग्रस्तांच्या खात्यात जास्तीत जास्त मदत जमा करावी. काही जिल्हाधिकारी निधीची, शासन आदेशाची सबब पुढे करीत आहे. मात्र प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली असून पुरेसा निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही सबबी न सांगता दिवाळीपूर्वी आपत्तीग्रस्तांना मदत कशी मिळेल याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

वेळ कमी असल्याने प्रत्येक आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचविण्यात अडचणी असल्याची सरकारला कल्पना आहे, राज्यातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, त्यांची दिवाळी गोड व्हावी यासासाठी यंत्रणेने झोकून देऊन काम करावे अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles