अहिल्यानगर- जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी येथे डुकरांना आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण झाली आहे. या विषाणूजन्य आजाराने साकुरीत डुकरांचा बळी घेतल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी येथील एक किलो मीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. प्रशासनाकडून तेथील मृत व जिवंत डुकरांची विल्हेवाट लावली जात आहे. पशूसंवर्धन विभागाने आतापर्यंत 10 डुकरांना दयामरण दिलेले असून साकुरीचा बाधित भाग राहाता नगर पालिकेच्या हद्दीपर्यंत येत असल्याने (दि. 9, मंगळवार) राहाता पालिका हद्दीत आफ्रिकर स्वाइन फिवरची लागण झालेल्या डुकरांची शोध मोहिम राबवण्यात येणार आहे. तसेच संनियंत्रण भागात येणार्या डुकरांचे कलिंग करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यात प्रथमच आफ्रिकन स्वाइन फिवर आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यात या आजाराची लागण झाली होती. डुकरांना होणार्या या फिवरमुळे लोकांना धोका नाही. परंतू खबरदारी म्हणून मांस विक्रीवर बंदी, तसेच बाधित भागाच्या एक किलो मीटर त्रिज्येत, तसेच 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरास संनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येवून इतरही उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यांत राहाता तालुक्यातील साकुरी गावातील काही डुकरांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर आले.त्याचे नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. ते सर्व नमुने बाधित आढळून आल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. साकुरीत एका व्यक्तीने बंदिस्त वराह पालन केले होते.
त्यामुळे ही बाब निदर्शनास आली. भटकी डुकरे दगावली असती तर आफ्रिकन फिवर समोर येण्यास उशीर झाला असता. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर साकुरी येथील जिवंत डुकरांचे शास्त्रीय पद्धतीने कलिंग (दया मरण) केले जात आहे. साकुरीत आतापर्यंत शोधून शोधून 10 डुकरांचे कलिंग करण्यात आले आहे. साकुरीतील बाधित आणि संनियणातील काही भाग राहाता नगर पालिका हद्दीत येत आहे. यामुळे पशूसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील यांनी सोमवारी राहाता नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून आजपासून नगर पालिका हद्दीतील डुंकराचा शोध घेवून त्यांचे कलिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे साकुरीतील डुकरे हे राहात्यासाठी ताप ठरणार आहेत.
कोविड प्रमाणे आता स्वाइन फिवर असणार्या साकुरी आणि राहाता पालिकेच्या भागात सोडियम हायड्रोक्लोराइड, हायपोक्लोराइंट, क्लोरिनची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला जात आहे. तसेच यापूर्वी आणि यापूढे मारल्या जाणार्या डुकरांना प्रतिकिलोप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांचे वजन केले जात असल्याचे पशूसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक गावात सध्या मोकाट आणि पाळण्यात येणार्या डुकरांच्या नोंदी नाहीत. पशूसंवर्धन विभागाच्या 20 व्या पशूगणेत जिल्ह्यात एकही डुकर नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी व्यापारी अथवा विशिष्ट समाजातील व्यक्त नाशिक आणि अन्य जिल्ह्यातून दोन महिने वय असणारी डुकरांची पिल्ले आणून ती बंदिस्त अथवा गावात सोडून त्यांना मोठे करतात आणि नंतर पकडून ते मांसविक्रीसाठी पाठवून देतात. गाव पातळीवर त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने संसर्गजन्य रोगाचा धोका वाढला असून स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या अनेक ठिकाणच्या तक्रारी आहेत.
स्वाइन फिवर आणि स्वाइन फ्लू असे नावात साधर्म्य असले तरी त्याची लक्षणे वेगळी आहे. स्वाइन फिवर हा डुकरांपासून डुकरांनाच होतो. तो माणसात संक्रमित होत नाही. तरीही खबरदारी म्हणून त्याचे मांस खाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. स्वाइन फ्लू हा एच 1 एन 1 इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होतो. प्रारंभी तो डुकरांमध्ये आढळत होता. नंतर त्याचे संक्रमण माणसांत झाले. आफ्रिकन स्वाइन फिवरमुळे माणसात संक्रमण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केले आहे.


