Friday, February 20, 2026

अहिल्यानगर जिल्हातील जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आल्या एकत्र ; घेतला मोठा निर्णय

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनांचे एकत्रीकरण
दोन्ही संघटला आल्या एकत्र; जुनी पेन्शन, टीईटी धोरणाविरोधात संयुक्त लढ्याचा निर्धार
महिनाभरात नवीन सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारणी जाहीर होणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची सहविचार सभा माध्यमिक शिक्षक भवन येथे उत्साहात व एकोपा दर्शवत पार पडली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील दोन स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या माध्यमिक शिक्षक संघटनांचे एकत्रीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही वर्षांत जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना दोन गटांत विभागली गेली होती. त्यामुळे शिक्षकांचे विविध प्रश्‍न मांडताना व शासनदरबारी पाठपुरावा करताना अडचणी निर्माण होत होत्या. अनेक विषयांवर एकवाक्यता नसल्याने शिक्षकांच्या हितासाठी ठोस भूमिका घेणे कठीण जात होते. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही संघटनांचे अध्यक्ष, सचिव व प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्र येऊन संघटनात्मक एकजूट साधण्याचा निर्णय गुरुवारी (दि. 19 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत घेतला.
सभेला माजी अध्यक्ष चांगदेव कडू, माजी अध्यक्ष शिवाजीराव ढाळे, माजी अध्यक्ष राजेंद्र लांडे, संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाळे, रमजान हवालदार, राजेंद्र खेडकर तसेच प्रशांत होन, प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी मनमोकळ्या चर्चेतून शिक्षकांच्या भविष्यासाठी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली.
बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच शासनाने लागू केलेल्या टीईटी धोरणाबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट करत त्याविरोधात ठोस भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले.
याशिवाय शिक्षणाधिकारी कार्यालयातील प्रलंबित कामे, दप्तर दिरंगाई, सेवा विषयक अडचणी, वेतन व पदोन्नती संदर्भातील प्रश्‍न यावर सखोल चर्चा झाली. भविष्यात सर्व प्रश्‍नांवर एकत्रितपणे आणि संघटित पद्धतीने पाठपुरावा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. सभेच्या शेवटी जिल्हा स्तरावर एकच सर्वसमावेशक कार्यकारणी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले असून, येत्या एक महिन्याच्या आत नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या एकत्रीकरणामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना अधिक बळ मिळणार असून, त्यांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठवता येणार असल्याचा विश्‍वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles