नगर – बिल्डिंगमध्ये गोंधळ घालणार्यांना जाब विचारणार्या डॉक्टरला चौघाजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास एकविरा चौकातील म्हाडा बिल्डिंगमध्ये घडली. या घटनेत डॉक्टर जखमी झाले असून तोफखाना पोलिसांनी सोमनाथ गुंजाळ याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांवर गुन्हा नोंदविला आहे. डॉ. विश्वनाथ पांडुरंग काळे (वय 50, पाईपलाईन हडको, एकविरा चौक, अहिल्यानगर) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे.
एकविरा चौकाजवळ म्हाडाच्या चार बिल्डिंग आहेत. यातील प्राईम केअर हॉस्पिटलसमोरील बी बिल्डिंगमध्ये डॉ. काळे यांचे क्लिनिक आहे. या बिल्डिंगमध्ये मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास वरच्या मजल्यावर कुणीतरी गोंधळ घालत असल्याचे डॉ. काळे यांनी सुरक्षारक्षक किरण कुर्हाडे याच्या निदर्शनास आणून दिले. त्याने ‘त्यांच्या नादी लागू नका, ते थोड्या वेळाने निघून जातील’ असे डॉ. काळेंना सांगून तो निघून गेला. थोड्या वेळाने वरच्या मजल्यावरून सोमनाथ गुंजाळ याच्यासह इतर दोघे अनोळखी खाली आले. बिल्डिंगमध्ये संगणक व्यवसाय करणार्या विशाल ढापसे यांनी त्यांना थांबवून ‘वरच्या मजल्यावर गोंधळ का घालता’ असे विचारले. त्याचा राग आल्याने सोमनाथ गुंजाळ याने आणखी एका साथीदाराला खाली बोलावून घेतले. गुंजाळ व त्याच्या तीन साथीदारांनी ढापसे व डॉ. काळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर गुंजाळने साथीदारांच्या मदतीने डॉ. काळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर खाली पडलेल्या डॉ. काळेंना आरोपींनी पुन्हा मारहाण केली व चेहर्यावर टणक वस्तू मारली. यात डॉ. काळे यांच्या चेहर्यावर मार लागला, तसेच बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. जखमी अवस्थेत डॉ. काळे यांना त्यांच्या मित्रांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काल (बुधवारी) डॉ. काळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ गुंजाळ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यासह अन्य तीन अनोळखी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अवैध धंदे, मद्यपींचा धुमाकूळ
दरम्यान, एकविरा चौकातील म्हाडाच्या बिल्डिंग परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिस अधीक्षकांंना यापूर्वीच निवेदन दिले होते. अवैध धंद्यांबरोबरच बिल्डिंगच्या पार्किंमध्ये अनेकजण मद्यपान करून गोंधळ घालतात. आरडाओरड करून शिवीगाळ करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आता आंदोलन करण्याचा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला आहे
अहिल्यानगर शहरात डॉक्टरला बेदम मारहाण ; तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Advertisement -


