अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर धक्कातंत्राचं सत्र सुरूच आहे. भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लादलं. तसेच रशियाकडून तेल आयात केल्यास दंड आकारणार असल्याचा निर्णय घेतला. मात्र, आता भारताला अमेरिकेतून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर ५० टक्के कर (यूएस टॅरिफ) भरावा लागणार आहे.
मात्र, ट्रम्प येथेच थांबलेले नाहीत. अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावल्याच्या घोषणेनंतर त्यांनी भारतावर दुय्यम निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. हे निर्बंध लवकरच लागू होण्याची शक्यता असून त्याचा थेट प्रभाव भारत-अमेरिका व्यापारी संबंधांवर होऊ शकतो.यासंदर्भात भारतीय अधिकारी म्हणतात, भारतासह चीनसारखे इतर देशही रशियाकडून तेल आयात करतात. मग अतिरिक्त निर्बंधांसाठी तुम्ही फक्त भारतालाच लक्ष्य का करत आहात? यावर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं की, ‘याला फक्त ८ तास झाले आहेत. काय होते ते पाहुयात. तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील. तुम्हाला अनेक अतिरिक्त निर्बंध दिसतील’, असे थेट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. तसेच चीनवरही निर्बंध लादण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रम्प यांनी चीनवरही अशाच प्रकारचे निर्बंध लादण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘असं होऊ शकतं. ही बाब आम्ही काय निर्णय घेतो यावर अवलंबून आहे,’ असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. याआधी त्यांनी भारतातील आयातीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, युक्रेन युद्धामुळे रशियाला लादलेले निर्बंध अधिक प्रभावी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. या आदेशात त्यांनी भारत रशियाकडून तेल आयात करत असल्याचं नमूद केलं. जी अमेरिका त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक मानत आहे.


