माळीवाडा वेस पाडू नका
खा.नीलेश लंके यांची महापालिकेकडे मागणी
ऐतिहासिक वारसा संरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी
अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक ओळख असलेली माळीवाडा वेस पडण्याच्या हालचालींना खासदार नीलेश लंके यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या सविस्तर निवेदनात त्यांनी राज्यघटनेतील कलम ४९ चा थेट दाखला देत वेशीचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याची राज्याची सक्त जबाबदारी अधोरेखित केली आहे.
खासदार लंके यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “माळीवाडा वेस पाडणे हा निर्णय केवळ अविवेकीच नव्हे तर संविधानिक दृष्ट्या चुकीचा ठरेल. राज्यघटनेने संरक्षित मानलेल्या वारशावर कुणालाही हात टाकण्याचा अधिकार नाही.”
खा.लंके यांनी त्यांच्या निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या कलम ४९ चा उल्लेख करत माळीवाडा वेशीचा ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले आहे. या कलमानुसार, राज्याने प्रत्येक ऐतिहासिक व कलात्मक महत्वाच्या वास्तूचे संरक्षण करणे बंधनकारक आहे.त्यामुळे महापालिकेने वेस पाडण्याचा विचार करणेच संविधानभंगासमान असल्याचे त्यांनी स्पष्ट
खासदार लंके यांनी वेशीचे सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्व विशेषत्वाने मांडले. त्यांनी नमूद केले की ही वेस १४९०–१४९४ मधील नगर स्थापनेशी निगडित आहे.निजामशाही तटबंदीचा एक प्रमुख भाग व शहाजहानकालीन किल्लेदार सर्जेखानाने बळकट केलेली १८०३ च्या ब्रिटिश–मराठा युद्धाची साक्ष आहे.
ही वेस महात्मा फुले पुतळा (१९५९) आणि पहिल्या एसटी बसेसच्या प्रारंभाशी संबंधित असून शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता व जनचळवळींचे केंद्र आहे. अशा सर्व घटकांसह वेस स्वतःमध्ये नगरचा इतिहास ‘जिवंत दस्तऐवज’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार लंके यांनी निदर्शनास आणले की कलम ४९ मध्ये “संरक्षित” हा शब्द स्पष्ट आहे. त्यामुळे संरक्षण करणे हेच शासनाचे कर्तव्य असून ‘उध्वस्त’ हा शब्द राज्याच्या अधिकारातच बसत नाही. त्यामुळे महापालिका व राज्य सरकार या दोघांनीही वेस पाडण्याचा निर्णय घेणे हा कायद्याचा भंग ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
खासदारांनी महापालिकेला विकासासाठी रचनात्मक पर्यायही सुचविले आहेत. त्यात
वेस कायम ठेवून रस्त्याची पुनर्रचना, वाहतूक वळविण्याचे नियोजन, परिसराला ‘हेरिटेज कॉरिडॉर’ घोषित करणे तसेच
सुशोभीकरण, प्रकाशयोजना, सुरक्षा भिंत,आठवडी बाजार आणि हेरिटेज वॉक माहिती केंद्र यांचा समावेश आहे.
खासदार नीलेश लंके यांनी आयुक्तांकडे काही मागण्या केल्या, त्यात माळीवाडा वेस पाडण्याचा किंवा हलविण्याचा कोणताही प्रस्ताव तात्काळ स्थगित करावा. वेशीला “ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा स्थळ” म्हणून अधिकृत संरक्षण द्यावे. महापालिकेने वेशीचे संवर्धन, दुरुस्ती व सुशोभीकरण तत्काळ हाती घ्यावे. पुरातत्व विभाग, इतिहासतज्ज्ञ व हेरिटेज विशेषज्ञांची तज्ज्ञ समिती नियुक्त करावी.स्थानिक नागरिक, तज्ञ व प्रशासन यांच्यात पारदर्शक चर्चा आयोजित करावी.
“नगरची ओळख जपा”
खा. लंके यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत म्हटले की, “माळीवाडा वेस जपणे हे आपण सर्वांचे कर्तव्य आहे. हे नगरच्या शेकडो वर्षांच्या ओळखीचे प्रतीक आहे. वारसा वाचवा म्हणजे पुढील पिढीसाठी इतिहास सुरक्षित ठेवा.”


