*अहिल्यानगरचे डॉ. हृषिकेश पंडित यांची IAGE निवडणुकीमध्ये भारतातून सर्वाधिक मतांनी मॅनेजिंग कमिटी पदावर निवड!*
अहिल्यानगरचे प्रख्यात स्त्रीरोग व लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ह्रिषिकेश पंडित यांची इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकॉलॉजिक एंडोस्कोपीस्ट्स (IAGE) या देशातील अग्रगण्य स्त्रीरोग एंडोस्कोपी संघटनेच्या २०२६–२०२८ या कालावधीसाठी मॅनेजिंग कमिटी मध्ये भारतातून सर्वाधिक मताने सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि देशभरातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
सन २००१ मध्ये स्थापन झालेली IAGE ही संस्था लॅप्रोस्कोपी व हिस्टेरोस्कोपीसारख्या अत्याधुनिक, मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे. आज IAGE ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्त्रीरोग एंडोस्कोपी संघटना म्हणून ओळखली जाते. देशभरातील हजारो स्त्रीरोग तज्ज्ञ सदस्य, मजबूत शैक्षणिक परंपरा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता यामुळे संस्थेचे विशेष स्थान निर्माण झाले आहे.
IAGE मार्फत नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, सर्जरी वर्कशॉप्स, लॅपरोस्कोपी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स राबविले जातात. या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील स्त्रीरोग तज्ज्ञांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळाली आहे. परिणामी महिलांसाठी कमी वेदना, जलद रिकव्हरी, कमी रक्तस्त्राव आणि अधिक अचूक, सुरक्षित शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या आहेत.
अहिल्यानगर येथील पंडित हॉस्पिटल – मॅटर्निटी केअर अँड 3D लॅप्रोस्कोपी सेंटरचे संचालक म्हणून डॉ. पंडित यांनी जिल्ह्यात अत्याधुनिक 3D लॅप्रोस्कोपीची सुरुवात करून नवे पर्व सुरू केले आहे. एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉईड्स, सर्व्हायकल व इतर स्त्रीरोग कर्करोग शस्त्रक्रिया तसेच वंध्यत्व उपचार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांची IAGE च्या व्यवस्थापन समितीवर झालेली पुनर्निवड ही केवळ वैयक्तिक यश नसून अहिल्यानगरसाठीही अभिमानाची बाब आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आता अहिल्यानागरमध्येही उपलब्ध आहे.
डॉ. ह्रिषिकेश पंडित यांना या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यकाळातही ते देशातील स्त्रीरोग एंडोस्कोपीच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


