अहिल्यानगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बुधवारी (3 सप्टेंबर) सायंकाळी उशिरा जाहीर केली. या प्रारूप रचनेनुसार महापालिकेतील एकूण 17 प्रभाग ठेवण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक अशा 68 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, बहुसंख्य प्रभाग रचनेची तोडफोड झाली आहे. तसेच प्रभागाचे क्रमांकात देखील बदल करण्यात आला आहे.2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ही प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही प्रभागांची तोडफोड झाली असून नव्या रचनेत प्रभाग क्रमांक तसेच भौगोलिक सीमारेषाही बदलल्या आहेत. काही भाग इतर प्रभागांमध्ये जोडण्यात आले असल्याने नागरिकांना आता वेगळ्या प्रभागातून आपला प्रतिनिधी निवडावा लागणार आहे. या प्रारूपात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये गावडे मळा परिसर, जो आधी प्रभाग 1 मध्ये होता, तो आता प्रभाग 2 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नागापूर गावठाण परिसर, जो प्रभाग 7 मध्ये होता, तो आता प्रभाग 1 मध्ये जोडला गेला आहे.गांधीनगर परिसर प्रभाग 8 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे काही प्रभागांची लोकसंख्या कमी-जास्त झाली असून स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही 2011 च्या जनगणनेच्या आधारावरच 17 प्रभाग निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी एकूण 68 नगरसेवकांची निवड झाली होती. या मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर 2024 मध्ये संपला. त्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने 23 जून 2025 रोजी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना, नकाशे आणि लोकसंख्येचा तपशील महापालिका आयुक्त डांगे यांनी आता प्रसिध्द केला आहे.
प्रभागांचे नवे आराखडे जाहीर झाल्यामुळे नागरिकांना आता स्वतःच्या क्षेत्रातील बदलांची माहिती घेणे आवश्यक झाले आहे. कुठल्या प्रभागात आपण समाविष्ट आहोत, आपला मतदान केंद्र कोणत्या सीमारेषेत येणार आहे हे समजून घेणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय, पुढील निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांना नव्या प्रभाग रचनेनुसार प्रचार धोरण आखावे लागणार आहे.
महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे आगामी निवडणुकांची रंगत वाढली आहे. काही भागांचे प्रभागांमध्ये झालेले बदल हे स्थानिक राजकारणाला नवे वळण देऊ शकतात. नागरिकांनी आता 15 सप्टेंबरपर्यंत आपापल्या हरकती दाखल कराव्यात, असे 3 ते 15 सप्टेंबर : प्रारूप रचनेवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत, 16 ते 22 सप्टेंबर : जिल्हाधिकार्यांमार्फत नियुक्त अधिकारी हरकतींवर सुनावणी घेतील, 23 ते 25 सप्टेंबर : सुनावणीनंतरच्या शिफारशींसह अंतिम आराखडा नगरविकास विभागाकडे पाठवला जाईल, 26 ते 30 सप्टेंबर : नगरविकास विभाग राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम प्रस्ताव सादर करेल, 9 ते 13 ऑक्टोबर : राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना जाहीर करतीलआवाहन प्रशासनाने केले आहे.