अहिल्यानगर-शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका नामांकित शाळेच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडणार्या बस चालकानेच तिच्यासोबत बसमध्येच अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (15 ऑक्टोबर) दुपारी सावेडी उपनगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी नराधम बस चालकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळू दादा वैरागर (रा. मांजरसुंभा, डोंगरगण ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शहरातील हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकते. सध्या तिची सहामाही परीक्षा सुरू असल्याने ती दुपारी लवकर घरी परतत होती. बुधवारी दुपारी पेपर सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे स्कूल बसने (एमएच 20 डब्लू 9931) घरी निघाली.
सर्व मुलांना त्यांच्या थांब्यावर सोडल्यानंतर बसमध्ये पीडित मुलगी एकटीच राहिली होती. हीच संधी साधून चालक बाळू वैरागर याने तिच्या घराच्या जवळ बस थांबवून तिच्या सीटजवळ आला. त्याने मुलीचा हात धरून तिला ओढले आणि तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार घरी सांगितल्यास तुला मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, घटनास्थळी काही तरूणांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी चालकाला जाब विचारत चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पीडितेची आई आणि मामा घटनास्थळी दाखल झाले. घाबरलेल्या मुलीने सर्व हकीकत त्यांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी थेट तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


