Tuesday, October 28, 2025

फडणवीसांचा शिंदेंना पुन्हा धक्का ;आनंदाच्या शिधा’नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मंत्रालयाजवळ जीवन बिमा मार्ग येथे 909 चौ फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यातील केवळ 200 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी 700 चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन महायुतीसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना दणका देण्यात आला आहे. तर बिहारमध्ये भाजपसोबत मित्र पक्ष म्हणून राहिलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा देण्यात आली आहे. यावरुन आता महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या अनेक योजना नव्या सरकारकडून बंद करण्यात आल्याची ओरड सुरु आहे. यामध्ये शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे. मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही. फ्लॅगशिप योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना’सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले होते. एकाच शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेली ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर शिक्षण विभागातील माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सध्या बंद करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2023 शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली होती. मात्र, आता फडणवीस सरकारने आर्थिक चणचण असल्याचे कारण पुढे करत या योजनांसाठीची निधीपुरवठा बंद केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles