राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. मात्र, असं असतानाच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २२ आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत’, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली आहे. पण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करायचं? ते आमचेच आहेत”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.शिंदेंच्या शिवसेनेचे २२ आमदार हे भाजपाच्या गळाला लागल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “आता उद्या असं कोणीही म्हणू शकेल की, आदित्य ठाकरे यांचे जे २० आमदार आहेत, तेही भाजपाच्या गळाला लागले आहेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडं काही होतं”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
“शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचं? ते आमचेच आहेत. शिंदे शिवसेना ही आमचा मित्र पक्ष आहे. तिच खरी शिवसेना आहे. आमच्या मित्र पक्षाचे आमदार आमच्याकडे घेण्याचं अशा प्रकारचं राजकारण आम्ही कधीही करत नाहीत. उलट शिंदेंची शिवसेना आणखी मजबूत झाली पाहिजे,यासाठी आम्ही शिवसेनेच्या पाठिशी आहोत. तसेच भविष्यात नक्कीच भाजपा, शिवसेना आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


