स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक मतभेद असल्याचे वारंवार दिसून येत आहे. महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधील वाद हा फक्त राज्यापुरता मर्यादीत राहिला नसून तो आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील तणावाचे वातावरण वाढतच चालले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. अशातच राज्य सरकारमधील शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी मोठं विधान केले आहे.
दादा भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या हृदयात राहणारे मुख्यमंत्री आहेत आणि जनता त्यांना पुन्हा राज्याचे नेतृत्व करताना पाहतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या् निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या नेत्यांना पक्षात आणण्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशामध्ये दादा भुसे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोजित सभेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी यावेळी सांगितले की, ‘आजही जर तुम्ही लोकांना विचारले की त्यांच्या हृदयात कोणता मुख्यमंत्री आहे तर ते म्हणतील की एकनाथ शिंदे. पण काळजी करू नका. नशिबाने सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करताना आपण पाहू.’
यावेळी दादा भुसे यांनी असा दावा केला की, ‘एकनाथ शिंदे हे असे मुख्यमंत्री होते जे रात्री उशिरापर्यंत सर्वांना भेटायचे आणि दिवसाचे २०-२२ तास काम करायचे. महाराष्ट्राने एकनाथ शिंदेंसारखा दुर्मिळ मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही.’ तर एकनाथ शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे म्हटले की, ‘राज्याने कधीही असा मुख्यमंत्री पाहिला नाही ज्यांनी इतक्या महत्त्वाच्या मंजुरी दिल्या आहेत.’
दरम्यान, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेनेच्या एका आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, २०२२ च्या पक्षफुटीच्या वेळी उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी आमदाराने पैसे स्वीकारले होते. त्यांनी आरोप केला की, २०२२ मध्ये कळमनुरी मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पक्ष बदलण्यासाठी ५० कोटी रुपये घेतले होते. त्यांच्या या दाव्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


