अहिल्यानगर -जमिनीच्या वादातून एका वृध्द शेतकर्याला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना निंबोडी (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली आहे. राधाकिसन बळवंत भिंगारदिवे (वय 57, रा. फर्याबाग, अहिल्यानगर- सोलापूर रस्ता) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश चंदर भिंगारदिवे, संतोष चंदर भिंगारदिवे, संतोष भिंगारदेवेची पत्नी व दोन मुले आणि एक अनोळखीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भिंगारदिवे यांची निंबोडी शिवारात शेतजमीन आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी ते शेतात असताना संशयित आरोपी नागेश भिंगारदिवे, संतोष भिंगारदिवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी बेकायदेशीर जमवून फिर्यादीला गाठले.तू शेतात का आलास? अशी विचारणा करत त्यांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर फिर्यादीने 29 जानेवारी रोजी पोलिसांत धाव घेतली. कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रेवणनाथ मिसाळ करीत आहेत.


