वीज ग्राहकाचा कर्मचार्यांवर हल्ला
अहिल्यानगर: थकीत वीज बिल भरण्यास सांगितल्याच्या रागातून एका इसमाने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून महिला कर्मचार्यासह इतर कर्मचार्यांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गंजबाजार येथील जुने पॉवर हाऊस परिसरातील महावितरण कार्यालयात दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.गंजबाजार सेशनमधील एका ग्राहकाचे मागील ५ ते ६ महिन्यांपासून वीज बिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल न भरल्याने नियमानुसार त्यांचे वीज कनेशन तोडण्यात आले होते. याचाच राग मनात धरून तुषार सुंदर देठे (रा. धरती चौक, अहिल्यानगर) हा इसम कार्यालयात आला. त्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञ आणि इतर कर्मचार्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. संबंधित महिला कर्मचार्याने तक्रार विचारली असता, आरोपीने त्यांना अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. कार्यालयातील इतर कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी आले असता, आरोपीने त्यांच्या अंगावर दगड घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
नगर शहरात वीज ग्राहकाचा कर्मचार्यांवर हल्ला ; गुन्हा दाखल
- Advertisement -


