अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती योजनेचा’ लाभ — दिवाळीपूर्वी गोड बातमी
अहिल्यानगर: ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘आश्वासित प्रगती योजनेचा’ लाभ देण्यात आला आहे. मागील २ ते ३ वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकरण मार्गी लागल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कर्मचारी संघटनांकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा होत होता. त्यानुसार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिवाळीपूर्वी लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून पहिल्या टप्प्यात एकूण १५४ ग्रामपंचायत अधिकारी व ८ विस्तार अधिकारी यांना सुधारित ‘आश्वासित प्रगती योजने’चा लाभ वितरित करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अक्षरशः “गोड” झाली आहे. “शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या सकारात्मक भूमिकेमुळे आम्हाला न्याय मिळाला. आता कामाबाबत अधिक प्रेरणा मिळाली आहे,” असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पुढील टप्पा १५ नोव्हेंबरपर्यंत
विभागातील उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यात लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती योजना’चा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


