हर घर तिरंगा मोहिमेसाठी डॉ.अमोल बागुल यांची “तिरंगा स्वयंसेवक” म्हणून निवड
आठ लाख स्वयंसेवकातून डॉ.बागुल भारतात पाचव्या क्रमांकावर
अहिल्यानगर-
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या” हर घर तिरंगा-२०२५” या मोहिमेसाठी येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ अमोल बागुल यांची तिरंगा स्वयंसेवक/ ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली असून मीडिया अपलोड उपक्रमात कामगिरी व पोर्टलनुसार 13 ऑगस्टपर्यंत सुमारे आठ लाख स्वयंसेवकातून डॉ.बागूल भारतात पाचव्या क्रमांकावर आहेत.
या मोहिमेचा मंत्रालयाच्या वतीने प्राप्त झालेला बॅज डॉ.बागूल यांना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
“भौगोलिक क्षेत्राने मोठे असलेल्या जिल्ह्यातून या देशभक्तीपर चळवळीत योगदान देताना डॉ.बागुल देशात पाचव्या क्रमांकावर आहेत.ही जिल्ह्यासाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे. याआधी देखील लोकसभा- विधानसभा निवडणुका,स्वच्छता दूत,कॉपीमुक्त परीक्षा अभियान तसेच प्रशासनाच्या विविध उपक्रमात डॉ. बागूल यांचे सतत योगदान असते. या मोहिमेत सर्वांनी आपल्या घरावर सुयोग्य पद्धतीने तिरंगा फडकवावा व सेल्फी विथ तिरंगा फोटो पोर्टलवर अपलोड देखील करावा.”असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. आशिया यांनी केले.
भारत सरकारच्या माध्यमातून याआधी डॉ.बागुल यांनी जिल्ह्याचे स्वच्छतादूत ,मतदारदूत,नि:क्षय मित्र,सायबर ॲम्बेसिडर, युनिसेफ-WHO स्वयंसेवक, एडस् व्हॉटसअपदूत ,विद्यांजली स्वयंसेवक,इस्रो-नासा स्पेस एज्युकेटर,आदी घटकांच्या माध्यमातून स्वतःचे कलाकौशल्य व सोशल मीडियाचा चपखल वापर करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध उपक्रमांमध्ये भरघोस योगदान देऊन जिल्ह्याला अनेक जिल्हा, राज्य, विभाग, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिके प्राप्त झाली आहेत.


