कापूस व्यापार्याला पिस्तूल दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देत अडीच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जगताप (रा. बनपिंपरी) व अजय शेळके (रा.तांदळी दुमाला), शुभम रामचंद्र महाडीक (रा. रुईखेल) या तिघांसह इतर सात ते आठ अनोळखी इसमांसह सुमारे 11 जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी प्रशांत देविदास मते (वय 43 रा.निघोज शिर्डी ता.राहता,जि.अहिल्यानगर) या व्यापार्याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, प्रशांत मते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोडाऊन कापूस व कापसाच्या गाठी ठेवण्यासाठी भाडे तत्वावर घेतले होते. परंतु या गोडाऊनमध्ये थोडाफार कापूस आणि गाठी ठेवण्यात आल्या होत्या. मते 3 सप्टेंबरला श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आले असता संचालक बाबासाहेब जगताप व अजय शेळके, शुभम रामचंद्र महाडीक या तिघासह इतर सात ते आठ अनोळखी इसमांनी व्यापार्यास दमदाटी करत बळजबरीने चारचाकीत बसवून ब्लॅकमेल करत पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी देत सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली.
परंतु व्यापार्याने 30 लाख 30हजार रुपये रोख देऊन भीती पोटी उर्वरित रक्कम नंतर देतो म्हणून सुटका केली. परंतु व्यापार्याने उर्वरीत रक्कम न दिल्याने त्याला वारंवार व्हॉट्सअॅप कॉल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्रासाला कंटाळून अखेर प्रशांत मते यांनी शुक्रवारी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिसांत खंडणी, जीवे मारण्याची धमकी व आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.


