अहिल्यानगर -येथील लालटाकी भागातील बारस्कर कॉलनीत एका दारुड्या मेव्हण्याने कौटुंबिक वादातून आपल्या भाऊजीवर टोकदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईला शिवीगाळ का करतो, याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले. या हल्ल्यात भाऊजी गंभीर जखमी झाला असून, आरोपीने फिर्यादीच्या पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी ओंकार रवींद्र ननवरे (वय २५, रा. बारस्कर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. ओंकार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मेव्हणा असिफ इकबाल खान (रा. बारस्कर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार ननवरे आणि आरोपी असिफ खान हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारीच राहतात. आरोपी असिफ याला दारूचे व्यसन आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्याची पत्नीही त्याला सोडून गेल्याने तो नेहमी ओंकार यांना शिवीगाळ व मारहाण करत असे.काल (दि. २९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओंकार कामावरून घरी आले असता, आरोपी असिफ हा दारूच्या नशेत स्वतःच्या आईला (ओंकार यांच्या सासूला) शिवीगाळ करत होता. यावेळी ओंकार यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच, ओंकार यांच्या पत्नीनेही ’आईला मारहाण का करतो’ असे म्हणत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.
याचाच राग आल्याने असिफने किचन रूममधून टोकदार चाकू आणला आणि ओंकार यांच्यावर हल्ला चढविला. त्याने ओंकार यांच्या डाव्या हातावर, पोटावर आणि उजव्या गालावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी आलेल्या ओंकार यांच्या पत्नीलाही त्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर जखमी ओंकार ननवरे यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून आरोपी असिफ खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार अहिल्या गलांडे करीत आहेत.


