राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून राहुरी, नेवासा व सोनई येथील अनेक शेतकरी व व्यापार्यांची जवळपास काट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक मयत सचिन ठूबे यांच्यासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रामभाऊ फाटके, वय 37 वर्षे, रा. हिंगोणी, ता. नेवासा, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गणेश फाटके यांनी दि. 20 मार्च 2025 रोजी त्यांच्या शेतात पिकवलेला सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा 78 क्विंटल गहू राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीला विकला होता. त्यानंतर गणेश फाटके यांनी विकलेल्या गव्हाच्या पैशाची मागणी केली असता कंपनीचे संचालक व कर्मचार्यांकडून त्यांना वेळोवेळी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर कंपनीचे संचालक सचिन ठूबे यांनी आत्महत्या केली. काही दिवसांनी गणेश फाटके यांनी पुन्हा पैशाची मागणी केली असता, आता तुमचे बिलाचे रक्कम मिळणे अवघड आहे किंवा शक्यच नाही, तुमचे पैसे बुडाले, असे कंपनीच्या कर्मचार्यांकडून गणेश फाटके यांना उत्तर देण्यात आले.
त्याचबरोबर ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील मानोरी, वळण तसेच सोनई व नेवासा येथील अनेक शेतकरी व व्यापार्यांची सुमारे 65 लाख 42 हजार 339 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक, व्यवस्थापक व इतर सर्वांनी मिळून संगनमताने कट कारस्थान रचले. आणि राहुरी तालुक्यातील मानोरी येथील नानासाहेब आढाव, रुचिता काळे, प्रसाद वाघ, वळण येथील सोपान आढाव, संतोष काळे, सुर्यभान भाकरे, रविंद्र आढाव, नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील गणेश फाटके, अशोक खिल्लारी तसेच सोनई येथील पोपट ढाले, संजयकुमार भाळगट आदी शेतकरी व व्यापार्यांची फसवणूक करण्यात आली.
या बाबत गणेश रामभाऊ फाटके या शेतकर्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी मयत सचिन वसंत ठुबे यांच्यासह अर्जुन मच्छिंद्र ठुबे, बाळासाहेब हापसे, छाया दत्तात्रय कातोरे, कविता हापसे, सतिश ढोकणे, अनिल रखमाजी हापसे, सर्व राहणार ब्राम्हणी, ता. राहुरी या सात जणांवर गु.र.नं. 626/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 3 (5) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


