पाथर्डी: तालुक्यातील हत्राळ येथील शेतकरी मनोहर बाबासाहेब क्षीरसागर (वय 36) यांची दारू पाजून व अश्लील व्हिडीओची धमकी देत फसवणूक करून 80 गुंठे शेतजमीन हडपल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजयोग हॉटेलचा मालक कालिदास दत्तात्रय टकले (वय 30, रा. हत्राळ) याच्याविरुद्ध क्षीरसागर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर करीत आहेत.
दि. 27 मे रोजी सकाळी मनोहर क्षीरसागर हे आपल्या मोटारसायकलने शेवगाव-तिसगाव रोडवरील राजयोग हॉटेलमध्ये गेले असता हॉटेलचा मालक कालिदास टकले याने त्यांना दारू पाजली. त्यानंतर भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने त्यांना तिसगावला नेले. परत आल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या क्षीरसागर यांना हॉटेलमध्ये झोपवून टकले याने त्यांचा एका महिलेसोबत अश्लील व्हिडीओ बनविल्याचे सांगत तो व्हिडीओ गावात व्हायरल करण्याची धमकी दिली.यानंतर टकले याने क्षीरसागर यांना दुय्यम निबंधक कार्यालय, पाथर्डी येथे नेऊन काही कागदपत्रांवर सही करून घेतली. त्या वेळी क्षीरसागर पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याने काय सही घेतली जाते याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. या प्रक्रियेत संदीप साळवे (रा. चितळी, ता. पाथर्डी) आणि एक अनोळखी इसम उपस्थित होते.
काही दिवसांनंतर, दि. 4 जून रोजी क्षीरसागर यांचा लहान भाऊ सचिन (सध्या सैन्यदलात सेवेत, सिक्कीम येथे कार्यरत) याने फोनवरून सांगितले की, ई-चावडी संकेतस्थळावर त्यांची 80 गुंठे शेतजमीन (गट क्र. 223/1, शिवार हत्राळ) विक्रीखताद्वारे कालिदास टकले यांच्या नावावर झाल्याची नोंद दिसत आहे.
त्यानंतर क्षीरसागर यांनी चौकशी केली असता खरेदी दस्त क्रमांक 2123/2025 प्रमाणे जमीन टकले यांच्या नावे झाल्याचे आढळले. यानंतर क्षीरसागर यांनी मंडळ अधिकारी कार्यालयात हरकत अर्ज दाखल केला. दि. 17 जुलै रोजी मंडळ अधिकार्यांनी क्षीरसागर यांची बाजू ग्राह्य धरून, टकले याने धमकी देऊन व फसवणूक करून जमीन खरेदी केल्याचे मान्य करून नोंदणी नामंजूर केली.
जमीन विक्रीप्रसंगी कोणताही मोबदला क्षीरसागर यांना दिला नसल्याचेही उघड झाले. या संपूर्ण प्रकरणात दारू पाजून, अश्लील व्हिडीओची धमकी देऊन व फसवणूक करून जमीन हडपल्याचा आरोप टकले यांच्यावर करण्यात आला आहे.