आमच्या घरासमोरून का जातोस अशा क्षुल्लक कारणावरून शासकीय कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात अडवून, शिवीगाळ करत कुर्हाड आणि फावड्याने बेदम मारहाण केल्याची घटना केडगावमधील कोतकर मळा परिसरात घडली आहे. एवढ्यावरच न थांबता, तू जमीन विक आणि आम्हांला दे, नाहीतर तुला तुझे आयुष्य संपवून टाकू अशी जीवे मारण्याची धमकीही संशयित आरोपींनी दिली आहे.या हल्ल्यात नामदेव कोतकर (वय 45, रा. कोतकर मळा, केडगाव) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नामदेव कोतकर हे शासकीय गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ते कापड बाजारातून काम आटपून त्यांच्या मोटारसायकलवरून घराकडे जात होते. कोतकर मळा येथील महादेव कोतकर यांच्या घराजवळ आले असता, संशयित आरोपींनी त्यांना अडवले. तू आमच्या घरासमोरून का जातोस असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने शिवीगाळ का करता, असे विचारताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिला आरोपींनी फिर्यादीस धरून ठेवले आणि शुभम कोतकर याने छोट्या कुर्हाडीने फिर्यादीच्या डोळ्यावर वार केला. तर, महादेव कोतकर याने फावड्याने मारले. यावेळी इतर तिघे जण तेथे आले व त्यांनी जमीन विकून देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी जखमी नामदेव कोतकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधून दिलेल्या जबाबावरून, महादेव किसन कोतकर, पुष्पा महादेव कोतकर, शुभम महादेव कोतकर, कोमल शुभम कोतकर, साधु किसन कोतकर, नंदा साधु कोतकर, सागर साधु कोतकर, अशोक मोहन कराळे, गणेश पांडुरंग सातपुते आणि गणेश नानाभाऊ ठुबे (रा. केडगाव व सोनेवाडी परिसर) या 10 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


