केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे एका किरकोळ वादाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुण मित्रांवर सहाजणांच्या कुटुंबाने लोखंडी हत्यारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा थरार घडला.या हल्ल्यात अनिल सुरवसे (रा. ओंकार नगर, केडगाव) आणि त्याचा मित्र ओंकार निरफराके दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अनिल सुरवसे यांनी दिलेल्या जबाबावरून, कोतवाली पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरवसे आणि संशयित आरोपी पठाण (रा. माधवनगर, शाहूनगर) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती.
हा जुना वाद मिटवून, आपल्यात भांडण नको असे समजावून सांगण्यासाठी अनिल व ओंकार हे मध्यरात्री साहिलच्या घरासमोर गेले होते. त्यांनी साहिलला घराबाहेर बोलावून चर्चा सुरू केली. मात्र, बोलत असतानाच साहिलने अनिल व ओंकार यांना जोरजोरात शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. ओंकारने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच, साहिलने आरडाओरड करून घरातील लोकांना बाहेर बोलावले. त्याचा आवाज ऐकून साहिलचा भाऊ सोहेल पठाण, आई रिजवाना पठाण, वडील समीर पठाण, चुलती यास्मीन पठाण आणि चुलते चोंड्या ऊर्फ सलीम पठाण हे सर्वजण घरातून लोखंडी हत्यारे घेऊन बाहेर आले. त्यांनी येताच अनिल व ओंकार यांना खाली पाडून बेदम मारहाण सुरू केली.
यावेळी साहिलने अनिलच्या मांडीवर आणि सोहेलने ओंकारच्या पाठीवर धारदार हत्याराने पुन्हा वार केले. अत्यंत जखमी अवस्थेतही दोन्ही मित्रांनी ओंकारच्या दुचाकीवरून पळ काढत थेट रुग्णालय गाठले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी अनिल सुरवसे यांचा सविस्तर जबाब नोंदवला. या जबाबावरून पोलिसांनी साहिल पठाण, सोहेल पठाण, रिजवाना पठाण, समीर पठाण, यास्मीन पठाण व चोंड्या ऊर्फ सलीम पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.


